पोलिस पाटील संघ पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी कार्याध्यक्षपदी हर्षदाताई संकपाळ
टाकळी हाजी |
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी कार्याध्यक्षपदी शिरूर तालुक्यातील हर्षदाताई राहुल संकपाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या पदावर निवड झाल्यामुळे शिरूर तालुक्याला मानाचा मुकुट लाभला असून, विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय सन्मान सोहळा व पदग्रहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी भूषवले.
या कार्यक्रमात आमदार महेश लांडगे, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, संस्थापक अध्यक्ष भिकाजी पाटील, साहेबराव राळे, तृप्ती मांडेकर, सुधीर दिघे, किरण शिवनकर, मोनिका कचरे आदी मान्यवर उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी यावेळी बोलताना पोलिस पाटलांच्या विविध मागण्यांविषयी सकारात्मक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करून त्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. गावपातळीवर पोलिस पाटलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून त्यांचे सक्षमीकरण ही शासनाची प्राथमिकता असल्याचे ते म्हणाले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी संधी
हर्षदा संकपाळ यांची निवड झाल्याने शिरूर तालुक्यातील महिलांना नेतृत्वाची नवी दिशा मिळाली आहे. त्यांनी या पदाचा उपयोग ग्रामीण भागातील महिलांच्या हक्कांसाठी आणि पोलिस पाटील सशक्तीकरणासाठी प्रभावीपणे करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अभिनंदनाचा वर्षाव
संकपाळ यांच्या निवडीनंतर शिरूर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.