शांताई दूध डेअरी तर्फे ६८ लक्ष रुपये बोनस वाटप…
चेअरमन दिलीपशेठ सोदक यांच्यामुळे गरिबांची दिवाळी गोड....
टाकळी हाजी : प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील दूध संकलन करणारी सर्वात मोठी दूध डेअरी टाकळी हाजी येथील दिलीपशेठ सोदक यांच्या शांताई दूध डेअरी तर्फे गवळ्यांना सुमारे ६८ लक्ष रुपये बोनस वाटप करण्यात आले.तसेच गरजू कुटुंबांतील लहान मुलांना दिवाळीचा आनंद साजरा करता यावा यासाठी कपडे वाटप करण्यात आले.
सन २०११ मध्ये सुरू झालेल्या प्रकल्पाची सुरुवात दोन हजार लिटर दूध संकलनाने झाली असून आज ३० हजार लिटर दूध संकलन करणारी या भागातील सर्वात मोठी संस्था असा नावलौकिक या डेअरीने मिळविला आहे.प्रती लिटर एक रुपया याप्रमाणे सात महिन्यांच्या संकलनावर १५३५ गवळ्यांना बोनसचे वाटप केले आहे.संपूर्ण बेट भागातून थेट शेतकऱ्यांच्या घरून दूध संकलन केले जाते.
संस्थेचे चेअरमन दिलीपशेठ सोदक यांनी गोरगरीब शेतकऱ्यांना दूध धंदा सुरू करण्यासाठी गायी खरेदी करण्यापासून ते पशुखाद्य घरपोच पुरविण्यापर्यंत सेवा दिल्यामुळे अनेक कुटुंबांची भरभराट झाली आहे.अतिशय नाजूक परिस्थितीतून व्यवसायाची कास धरलेल्या सोदक यांनी सर्वसामान्यांच्या परिस्थितीची जाण ठेवत त्यांना आर्थिक मदत तर केलीच पण आपल्या संस्थेच्या सभासदांचे हित जोपासले जाईल याची काळजी घेत दिपावली निमित्त बोनस वाटप करून समाजासमोर एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला.
टाकळी हाजी, मलठण, कवठे येमाई, वडनेर, निमगाव दुडे, फाकटे, रावडेवाडी या परिसरातील संस्थेचे सभासद (गवळी) सोडून ज्यांना दिवाळी साजरी करता येणार नाही अशा कुटुंबांतील लहान मुलांना दिवाळीचा आनंद साजरा करता यावा यासाठी त्यांनी २४८ मुलांना स्वतः दुकानात नेवून त्यांच्या आवडीने पसंतीनुसार कपडे घेवून दिले. यामुळे दिवाळीची चाहूल लागून ही स्वतःच्या आनंदावर विरजण घालणाऱ्या कुटुंबात आनंदोत्सव साजरा झाला.
उद्योग समूहाच्या दूध डेअरी आणि नव्याने सुरू झालेल्या पशुखाद्य प्रकल्पात ८० कामगार काम करत असून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे . जवळपास २९ पीक अप गाड्या दूध संकलन आणि पशुखाद्य घरपोच सेवा दररोज देत आहेत.समूहाचे सर्व व्यवस्थापन दिलीपशेठ यांच्या सोबत त्यांची पत्नी आणि मुलगा निलेश हे पाहत आहेत.
त्यांच्या या उपक्रमाचे पुणे जिल्हा परिषदेचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, सोसायटीचे चेअरमन बन्सीशेठ घोडे टाकळी हाजी चे माजी आदर्श सरपंच दामुशेठ घोडे,सरपंच अरुणाताई घोडे, उपसरपंच गोविंद गावडे यांनी कौतुक केले.
” गरिबीची जाण ठेवत, सर्वसामान्यांना बरोबर घेऊन यशाची शिखरे पादाक्रांत करताना पत्नी,मुले, नातेवाईक, मित्र मंडळी यांचीही मोलाची साथ मिळाली.”
…… दिलीपशेठ सोदक,चेअरमन शांताई उद्योग समूह