दामूआण्णा म्हणजे माणुसकीचा मनोरा बांधणारा लोकनेता
शिरुर- आंबेगाव, पारनेर परिसरात सद्य परिस्थितीत दामूआण्णांचा डंका
बापू जाधव : निमोणे
टाकळी हाजी (ता.शिरूर) गावचे माजी आदर्श सरपंच आणि बेट भागाचे उभरते नेतृत्व दामूआण्णा घोडे यांनी लग्न घरी सदिच्छा भेट देऊन नवरदेव हभप. अजित महाराज साळवे व बंधू प्रसिद्ध ताशा वादक गुरुनाथ रावसाहेब साळवे , पत्नी पूजा गुरुनाथ साळवे या मान्यवरांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. हा मेसेज गृपवर वाचला आणि राहवले नाही. म्हणून त्यांच्याप्रती चार शब्द …
उभा पोषाख …मानले राव दामू आण्णांना…तसे व्यक्तिशः या माणसाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग मला अद्याप आला नाही…पण हे पाणी पारंपरिक राजकारणाला हुलकावणी देणारे आहे हे माञ नक्की ! माणसं गृहीत धरण्याच्या प्रवृत्तीला सणसणीत चपराक मारली राव दामू आण्णांनी…!
माध्यम क्षेञात मी जवळजवळ दहा- पंधरा वर्षे खूप जवळून वावरलो…सुदैवाने तालुक्याच्या राजकारणातील पहिल्या फळीपासून सर्वच क्षेञातील मातब्बरांशी माझा बऱ्यापैकी सबंध आला … राजकारण्यांचे चेहरे अन् मुखवटे मला जवळून पाहण्याचा योग आला…व्यासपीठावर हळवा होऊन भाषण ठोकणारा राजकारणी वैयक्तिक जीवनात किती पातळयंञी असतो हेही जवळून पाहिले..अनुभवले . माञ या सगळ्या सिध्दांताला माणूसकीच्या जोरावर धोबीपछाड देणाऱ्या दामू आण्णाची किर्ती शिरुर- आंबेगाव, पारनेर परिसरात सद्य परिस्थितीत चांगली डंका मारत आहे…
राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा असतो! ज्याला स्वतः चे घर भरता येते तोच राजकारणात टिकतो ही म्हण दामू आण्णांनी अक्षरशः पायदळी तुडवली. बघा ना राव… आमदाबाद येथील एका दलित कुटुंबात विवाहाची तयारी सुरु आहे. पै- पाव्हण्यांचा आहेर येण्याअगोदर दामूआण्णा घोडे उभा पोषाख घेऊन हजर !
मी आज पर्यत शंभर वेळा तरी ऐकलं असेल की बेट भागातील बहुतांशी लग्नात दामू आण्णांचा उभा पोषाख असतो. त्या परिसराच्या सुख – दुःखात दामू आण्णा सगळ्यात प्रथम धावून जातात..जातपात- धर्म न पाहता माणूसकीची साखर पेरणी करणारा हा गडी पारंपरिक राजकारणाच्या फाट्यावर मारुन स्वतःचे विश्व निर्माण करतोय!
दामू आण्णांसारखी माणसं ही खरोखरच समाजाने जपली पाहिजे…जवळच्या पाव्हण्याच्या लग्नात उभा पोषाख घेऊन जायचं म्हटलं तरी आजच्या महागाई च्या दिवसात अंगावर काटा येतो .. विचार करा सगळ्या बेट भागातील लग्न समारंभात पोषाख देण्यासाठी दामू आण्णांना किती काट्यावरची कसरत करावी लागत असेल..
कर्त्या माणसाच्या अडचणी त्याची दुःख कधी चेहऱ्यावर दिसत नाहीत किंवा ती माणसं कधी बोलूनही दाखवत नाहीत .. पण दातृत्वाचा यज्ञ मांडणाऱ्या या लोकवेड्या माणसाला टाकळी हाजीच्या गावकऱ्यांनी जाणले… आज वेळ आहे सगळ्या बेट भागाने जाणावे..उद्याच्या काळात माणूसकीचा मनोरा बांधणाऱ्या या लोकनेत्याला लोकांचे भवितव्य ठरविणाऱ्या सभागृहात लोकांनी पाठविण्याचा निर्धार केला आहे…फक्त वेळीची वाट पाहिली जाते हे मात्र खरे आहे.
…….. शब्दांकन – बापू जाधव, निमोणे