टाकळी हाजीत बँक ऑफ महाराष्ट्रचे कामकाज तब्बल दोन आठवडे ठप्प

सर्वर डाऊनचा खातेदारांना मनस्ताप |

0

 

टाकळी हाजी : 

बँक ऑफ महाराष्ट्रच्या टाकळी हाजी (ता. शिरूर) शाखेतील कामकाज गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असून व्यवहार करण्यासाठी खातेदारांना मलठण शाखेत जावे लागत आहे. बँकेच्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांबरोबरच कर्मचारीही वैतागले आहेत. दररोज सकाळी टाकळी हाजी शाखेत येवून तेथून मलठण शाखेत जावे लागत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे.

बँक सुरू झाली असेल या आशेने खातेदार दररोज टाकळी हाजी शाखे समोर चकरा मारत आहेत. या शाखेत टाकळी हाजी, वडनेर, फाकटे, जांबुत, निघोज, गाडीलगाव, निमगाव दुडे, शरदवाडी, माळवाडी, म्हसे या गावांतील नागरिकांची खाती असून त्यांना प्रथम टाकळी हाजीला यावे लागते आणि परत मलठणला जावे लागते यामुळे खातेदारांची ससेहोलपट होत आहे.

या बँकेत खाते असल्याने अनेक महिलांना केवायसीची अडचण आल्याने लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेता आला नव्हता तसेच ऐन दिवाळीत बँक बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. कधी अधिकाऱ्यांची मुजोरी तर कधी कर्मचाऱ्यांचा अभाव …कधी सेवेप्रती नाराजी तर कधी प्रशासनाचा आडमुठेपणा या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने येथे महाराष्ट्र बँक ऐवजी दुसरी राष्ट्रीयकृत बँक सुरू करण्याविषयी निर्णय घ्यावा लागेल असे मत येथील नागरिक व्यक्त करत आहेत.

बँक प्रशासनातील वरिष्ठांनी लक्ष घालून लवकर सेवा सुरू करावी किंवा याबाबत खुलासा करावा ,म्हणजे नागरिकांची धावपळ होणार नाही. अशी मागणी सरपंच अरुणा घोडे, उपसरपंच गोविंद गावडे यांनी केली आहे.

काम सुरू आहे, लवकरच पूर्ववत सेवा सुरू होईल. खातेदारांनी सहकार्य करावे…

निलेश निकाळजे, शाखा व्यवस्थापक

Leave A Reply

Your email address will not be published.