पितृपक्षातच भाजपला पितृदशा नडली …भाजपाचा… विजय आणि यमराज ऐन निर्णायक क्षणी तुतारीच्या गोटात
बापू जाधव : निमोणे
| विधानसभा निवडणूकीला हाताच्या बोटावर मोजता येतील येवढे दिवस बाकी असताना माजी आमदार दिवंगत बाबुराव पाचर्णे यांचे कडवे समर्थक निमोण्याचे माजी सरपंच विजय भोस , घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष यमराज काळे , माजी सरपंच नानासो काळे यांनी थेट गोंविद बागेत जाऊन तुतारी हातात घेतल्याने शिरुर तालुक्याच्या पुर्व भागा बरोबरच शिरुर पंचक्रोशीची राजकीय समिकरणे बदलून गेली आहेत.
रांजणगाव औद्योगिक वसाहती मध्ये कार्यरत असणारे विजय भोस मागील पंधरा वर्षा पासून निमोणे परिसरातील सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत. गावचे सरपंच , सहकारी सोसायटीचे चेअरमन अशा विविध पदावर कार्यरत असण्या बरोबरच त्यांनी तालुक्याच्या राजकारणातील अनेक मातब्बर मंडळींशी आपुलकीचे संबध निर्माण करण्यात यश मिळवले असल्याने त्यांच्या बदल समाजामध्ये मोठी पसंती पहावयास मिळते.
राजकारणात भोस सरपंच म्हणजे भाजपाचा निष्ठावंत माणूस अशीच प्रतिमा निर्माण झाली होती, माञ पाचर्णे साहेबांच्या अकाली मृत्यू नंतर भाजपाचे निष्ठावंत आणि विद्यमान नेतृत्व यांच्यामध्ये हळूहळू दुरी निर्माण होऊ लागली.
कोणत्याही निवडणूकीत निमोणे परिसरात वेळ प्रसंगी पदरमोड करुन पक्षासाठी खस्ता खाणाऱ्या भोस यांची पक्षात होणारी घुसमट विरोधकांनी बरोबर हेरली , स्वाभिमानी स्वभावाच्या विजयराव यांच्या दुखऱ्या जखमेवर फुंकर मारुन त्यांचा थेट आमदार अशोक पवार यांच्या बरोबर संवाद घडवून आणला .शिरुर शहर पंचक्रोशितील नातेवाईकांचा गोतवळा , औद्योगिक वसाहतीतील मिञपरिवार व मागील पंधरा वर्षा पासून निमोण्याच्या राजकारणावर पकड असलेला बडा मोहरा हाताला येतोय म्हटल्यावर आमदार अशोक पवार यांनी वेगवान हालचाली करुन थेट शरद पवार यांच्या निवासस्थानी गोंविद बागेत विजय भोस व त्यांच्या समर्थकांची पवार साहेबां बरोबर भेट घडवून भविष्यात भोस यांचा योग्य तो मान सन्मान राखला जाईल याचे स्पष्ट संकेत दिले.
दरम्यान घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन यमराज काळे, माजी सरपंच नानासाहेब काळे , डाॕ.पुरुषोत्तम जगदाळे , योगेश काळे , रमेश काळे , बाळासाहेब काळे , हनुमंत काळे , होळकर , सचिन काळे आदींनी गोंविद बागेत शरदचंद्र पवार गटात प्रवेग केला. यावेळी आमदार अशोक पवार , सुजाता पवार , उद्योग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुभाष गव्हाणे , माजी सरपंच शाम काळे , संजय काळे , भाऊसाहेब काळे , संतोष जाधव आदी उपस्थित होते.