धोकादायक वळणावर अपघातांची मालिका
डोंगरगण चौफुला येथे दिशादर्शक फलक व गतिरोधक टाकण्याची मागणी
टाकळी हाजी |
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी – आमदाबाद रस्त्यावरील डोंगरगण चौफुला येथे अनेक दिवसांपासून अपघातांची मालिका सुरु आहे. शिरूर, रांजणगाव, मलठण , पुणे याठिकाणी जाण्यासाठी टाकळी हाजी वरून आमदाबाद कडे जावे लागते. या दरम्यान डोंगरगण चौफुला येथे चार रस्ते एकत्र येत असल्याने हे धोकादायक वळण घेताना अनेक अपघात घडत आहेत.
तेथे मिळणारे रस्ते हे टाकळी हाजी, आमदाबाद, डोंगरगण आणि म्हसे असे चार गावांकडून येतात. मात्र येथे मुख्य रस्ता हा टाकळी हाजी कडून आमदाबाद कडे जाणारा – येणारा असल्याने यावर मोठया प्रमाणात वाहतूक सुरू असते. परंतु ही वाहतूक सुरू असताना अचानक डोंगरगण किंवा म्हसे रस्त्याने येणाऱ्या वाहनांना अंदाज आला नाही किंवा वळण लक्षात आले नाही तर अपघात घडल्याच्या बहुतांशी घटना घडल्या आहेत.
चारचाकी आणि दुचाकीच्या अपघातात काही घटनांत दुचाकी वरील व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. तसेच तिथे मीना कालव्याची चारी असल्याने पुल बनविण्यात आला आहे. अपघातांमुळे या पुलाचे कठडे तुटले आहेत. काही व्यक्ती या कठड्यांमुळे बचावले आहेत तर काहींचा कठड्याला धडकल्याने जीव गेला आहे. तिथे शेजारीच एक हॉटेल होते, अनेकदा चालकांना वेग न आवरल्याने हॉटेल मध्ये वाहने घुसल्याने नुकसानीला कंटाळुन अखेर मालकाने हॉटेल दुसरीकडे हलविले आहे.
येथे होणाऱ्या अपघातांचा स्थानिक रहिवाशांना त्रास होत आहे. वाहनांची गती कमी झाली तर अपघात टळू शकतात. त्यामुळे या ठिकाणी चारही बाजूने गतिरोधक बनविण्यात यावेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी तसेच प्रवास्यांच्या सोयीसाठी येथे दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अशोक गावडे, भरत खामकर, विलास साबळे यांनी केली आहे.