टाकळी हाजी|
कवठे येमाई (ता.शिरूर) येथे पायी चाललेल्या महिलेला दुचाकी वरून आलेल्या तीन अज्ञात चोरटयांनी अडवून लुटण्याचा प्रकार मंगळवारी ( दि.९) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला.
द्वारकाबाई शंकर भोर (वय५०) रा.गणेशनगर, इनामवस्ती असे या लुटमार झालेल्या महिलेचे नाव असून द्वारकाबाई या कवठे येमाई येथून देवदर्शन करून घरी जात असताना बेंदाड ओढ्याजवळ मागून दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी द्वारकाबाई यांना एकटे पाहून गाडी मागे वळवली, एकाने त्यांचा हात धरला तर दुसऱ्याने त्यांच्या गळयातील एक तोळ्याची सोन्याची पोत हिसकावली. त्यांच्या हातातील पिशवी खाली पडली ती देखील चोरट्यांनी लांबवली.त्यात महिला बचत गटाची १० बचत पुस्तके ,१० महिलांची आधारकार्ड असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचवेळी कवठे येमाई सोसायटीचे माजी चेअरमन विक्रम इचके हे मोटार सायकल वरून तेथून चालले असताना लुटमारीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी गाडीवरून उतरून चोरट्यांच्या दिशेने दगड फेकले. मात्र त्यांच्या दिशेने धावताना दगडास ठेचळल्याने ते खाली पडले. त्यांच्या हाताला मार लागला आहे.या दरम्यान चोरटयांनी कोयत्यांचा धाक दाखवत तेथून दुचाकीवर पसार झाले.
माहिती मिळताच घटनास्थळावर ज्ञानसुख फटांगडे, काशिनाथ सरोदे , दत्तात्रय भोर हे लगेचच तेथे पोहचले. त्यांनी दुचाकीवरून चोरट्यांचा पाठलाग सुरु केला पण चोरटे पसार झाल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार सुभाष शेटे यांनी पोलीसांना घटनेची माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर,पोलीस कॉन्स्टेबल दीपक पवार, पोलीस पाटील गणेश पवार घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल केला असून शिरूर पोलीस पुढील तपास करत आहेत.