शेतकऱ्यांनी पशुधनांना ‘इअर टॅगिंग’ करून घ्यावे…

वनविभागाचे आवाहन...

0

टाकळी हाजी |

बिबट्याच्या तसेच वन्य पशुंच्या हल्ल्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्या किंवा जखमी झालेल्या पशुधनास इअर टॅगिंग केलेली नसल्यास पशु पालकांचे नुकसान होवू शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी पशुधनाची इअर टॅगिंग करून घ्यावे असे आवाहन शिरूर वनपरिक्षेत्र चे वनपाल गणेश पवार यांनी केले आहे.
पशुधनांची सर्वंकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी तसेच संभाव्य साथीच्या रोगांचे अंदाज व त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी राज्यातील पशुधनांची इअर टॅगिंग केल्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करण्याचा आदेश राज्य सरकारने दिलेला आहे. १ जून नंतर इअर टॅगिंग नसल्यास पशुधनाची खरेदी-विक्री करता येणार नसल्याचे शासनाने आदेशात स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन (एनडीएलएम) अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामध्ये इअर टॅगिंग करून १२ अंकी बारकोड नंबर देण्यात येतो.तसेच जन्म-मृत्यूची नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंधत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतराचा समावेश , पशुधनावरील उपचारांसाठी देण्यात येणाऱ्या औषधांचा समावेश, सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रणासाठी इअर टॅगिंग बंधनकारक करण्यात आले आहे.

नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुंच्या हल्ल्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम मिळणार नाही . इअर टॅगिंग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावागावांतील खरेदी-विक्री करण्यास मनाई असणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये पशुंची विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची इअर टॅगिंग झाल्याशिवाय तो मिळणार नाही. तसेच इअर टॅगिंग नसेल तर बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात पशुधनाची वाहतूक करता येणार नाही. असे अनेक बाबींना सामोरे जावे लागणार असल्याने शेतकऱ्यांनी पशुधनाची इअर टॅगिंग करणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.