टाकळी हाजी येथे बिबट्याचा कंपाऊंड मध्ये शिरून शेळ्यांवर हल्ला
साहेबराव लोखंडे | टाकळी हाजी
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील तामखरवाडी तील शेतकरी नारायण सोना गावडे यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. गुरूवारी (दि. ४) रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून यामध्ये तीन शेळ्या ठार व दोन करडे बिबट्याने फस्त केली.
गावडे कुटुंब शेताच्या जवळ रहात आहेत. घराच्या मागील बाजूस गोठ्यात तारेच्या कंपाऊंड मध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या. कंपाऊंड जास्त उंच नसल्याने बिबट्याने उडी मारून आत प्रवेश केला असावा असे गावडे यांनी सांगितले. बिबट्या आणि चोरांच्या भीतीने सर्वजण घरात झोपले होते, त्यामुळे शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आला नाही. सकाळी गोठ्यात गेल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वन विभागास कळविले. वनरक्षक लहू केसकर, वन कर्मचारी महेंद्र दाते यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आहे.
टाकळी हाजी परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य असून ऊसतोड झाल्यामुळे लपण क्षेत्र कमी झाले आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास टेमकरवस्ती येथील शेतकरी सुरेश लोखंडे व किरण किऱ्हे यांना रात्री दहाच्या सुमारास टेमकर वस्ती येथे शेताच्या बांधावरून बिबट्या जाताना दिसला होता. त्यांनी टेमकर वस्तीतील शेतकऱ्यांना कल्पना दिली होती. तेथून जवळपास तीन किलोमीटर अंतरावरील तामखरवाडी येथे हल्ला झाल्यामुळे बिबट्यांची संख्या वाढली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शेतकऱ्यांनी गोठ्याला उंच कंपाऊंड करून घ्यावे, तसेच रात्रीच्या वेळी शेतात एकट्याने जावू नये, सोबत उजेड ठेवावा तसेच मोबाईल वर मोठया आवाजात गाणी वाजवावीत असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
टाकळी हाजी, कवठे येमाई परिसरात ऊस तोड सुरू झाल्या पासून बिबट्याचे दर्शन नित्याचेच झाले आहे. वन विभागाने पशु धनावरील हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच हल्ले झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी टाकळी हाजी चे माजी सरपंच दामूशेठ घोडे यांनी केली.