शिरूर तालुक्यातील म्हसे बुद्रुक येथे नदीत पडून मुलगा बेपत्ता ….

प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीची अपेक्षा

0

शिरूर तालुक्यातील म्हसे बुद्रुक येथे नदीत पडून मुलगा बेपत्ता …. प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीची अपेक्षा

टाकळी हाजी सत्यशोध न्युज

शिरूर तालुक्यातील म्हसे बुद्रुक येथील कुकडी नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या गायकवाड परिवारातील मुलगा अक्षय (वय वर्ष १२) हा आज मंगळवार दिनांक २५ रोजी सकाळी दहा ते सव्वा दहा च्या दरम्यान नदीच्या पाण्यात पडला असून त्याला शोधण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.

पुणे व नगर जिल्ह्याची सरहद्द असलेल्या कुकडी नदीच्या एका बाजूला पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द व दुसऱ्या बाजूला शिरूर तालुक्यातील म्हसे बुद्रुक गाव आहे. या गावांना जोडणाऱ्या पुलाजवळ शिरूर तालुक्यातील म्हसे बुद्रुक हद्दीत नदी काठी पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द येथील दांपत्य राहुल नानाभाऊ गायकवाड, विमल राहुल गायकवाड हे मुलगा अक्षय व एक दहा वर्षाची मुलगी यांच्यासह कपडे धुण्यासाठी आले होते. गायकवाड दांपत्य कपडे धुत असताना त्यांचा मुलगा अक्षय हा पाय घसरून पाण्यात पडला, त्यावेळी त्याची आई विमल यांनी ते पाहताच त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. शेजारी असलेल्या लोकांच्या निदर्शनास येतात त्यांनी मुलाच्या आईला पाण्यातून बाहेर काढले.मात्र मुलाचा शोध लागला नाही. मुलाने कपडे काढलेले होते त्यामुळे त्याचा शोध घेण्यात स्थानिकांना अडचणी येत आहेत.

घटनेची माहिती मिळताच म्हसे बुद्रुकचे सरपंच सौरभ पवार ,सामाजिक कार्यकर्ते काळूराम पवार, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर मुसळे, म्हसे खुर्द चे सरपंच प्रवीण उदमले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या घटनेची माहिती टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे यांना देताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ पारनेरचे आमदार निलेश लंके तसेच शिरूर आणि पारनेर पोलीस स्टेशन यांना ही माहिती दिली.

नदीमध्ये वाहत्या पाण्यातही स्थानिक तरुणांनी अक्षय याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही त्यांना अक्षय मिळून न आल्याने स्पेशल रेस्क्यू टीम येण्याची नागरिक वत पाहत आहेत . या ठिकाणी पारनेरचे आमदार निलेश लंके, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती सुदामराव पवार,म्हसे बुद्रुक चे पोलीस पाटील वर्षा पवार, पांडुरंग खाडे, निघोज पोलीस दूरक्षेत्र व टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्र चे कर्मचारी तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष जाऊन शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

ऐन दिवाळीत अशी घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तब्बल पाच तास उलटूनही प्रशासकीय मदत न मिळाल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रशासकीय मदतीची अपेक्षा व्यक्त करत मुलाचा शोध कधी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.