टाकळी हाजी | कवठे येमाई (ता. शिरूर) येथील बस स्थानकाजवळ बुधवारी (ता. ३१) सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास बॅटरीवर चालणाऱ्या महिंद्रा चारचाकी गाडीचा अपघात झाला. गाडीचा एक्सलेटर गुंतून राहिल्याने आणि वाहनाने वेग धारण केल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दगडांच्या ढिगाऱ्यावरून समोर असणाऱ्या काटेरी झाडाला धडकून झाडात गुंतली. सुदैवाने गाडीत अमोल मुखेकर हे एकटेच होते. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून ते थोडक्यात बचावले.
चार महिन्यांपूर्वी त्यांनी महिंद्रा कंपनीची बॅटरीवर चालणारी एक्सयुव्ही ४०० ही गाडी खरेदी केली होती. सकाळी ते या गाडीतून दुकानात आले. त्यानंतर कामानिमित्त बाहेरगावी जायचे असल्याने त्यांनी गाडी सुरु केली. यावेळी गाडीचा एक्सलेटर गुंतून राहिल्याने गाडीने वेग घेतला. ब्रेक दाबून गाडी थांबविण्याचे प्रयत्न केले, परंतु गाडीने वेग धारण केल्याने गाडी दगडांच्या ढिगाऱ्यावरून थेट काटेरी झाडांना धडकली. यात वाहनाचे नुकसान झाले आहे. अपघाताबाबत कंपनीला कळविण्यात आले असून पुढील कार्यवाही त्वरित करण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे.