टाकळी हाजी येथे कालवडीवर बिबट्याचा हल्ला
साहेबराव लोखंडे : टाकळी हाजी
टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील साबळेवाडी येथील शेतकरी हरिदास खंडू उचाळे यांच्या दोन वर्षाच्या कालवडीवर बिबट्याने मंगळवारी (दि.१०) हल्ला करून ठार केले. उचाळे यांच्याकडे पाच संकरित गायी असून ही कालवड सर्वात मजबूत होती तरीही बिबट्याने तिच्यावर हल्ला केला आणि बांधलेल्या दोरासह ओढल्याने खुंटी उपसली आणि ओढत जवळपास १०० फूट अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात नेवून तिचा फडशा पाडला.
एवढी धष्टपुष्ट गाय ओढून नेल्याने हा बिबट्या मोठा असून तब्बेतीने मजबूत असल्याची शंका शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या भागातील बहुतांश शेतकरी शेतात राहत आहेत.सर्वांची जनावरे बाहेर बांधलेली असतात ,त्यामुळे सर्वांना घर आणि गोठ्याला कंपाऊंड करणे भाग पडणार आहे. अनेकदा आवाज उठवूनही वनविभाग टाकळी हाजी परिसरातील बिबटे शोधण्यास तयार नाहीत, त्यामुळे जनावरांबरोबरच मनुष्य सुद्धा कोण कधी त्याची शिकार बनेल हे सांगता येत नाही, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसली आहे . ग्रामपंचायत सदस्य विलास साबळे,बाबाजी साबळे, प्रियांका बारहाते यांनी परिसरात पिंजरे लावण्याची मागणी केली आहे.