विद्युत रोहित्र, कृषी पंप,केबल तसेच घरफोड्या रोखण्याचे शिरूर पोलिसांसमोर आव्हान
साहेबराव लोखंडे : टाकळी हाजी
शिरूर तालुक्यातील केबल, विद्युत रोहित्र, कृषी पंप तसेच घरफोडीच्या चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. नुकतेच सविंदणे, कवठे येमाई येथील विद्युत रोहित्र चोरी , आमदाबाद येथे घरफोडी झाल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली आले आहेत.
काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी केबल तसेच कृषी पंप चोरांवर कारवाई केली होती ,त्यावेळी काही गुन्ह्यांची उकल झाली. मात्र इतर चोऱ्यांच्या तपासाबाबत पोलिसांनी लक्ष घालण्याची मागणी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
घोड आणि कुकडी नदी किनारच्या टाकळी हाजी, आमदाबाद ,वडनेर, कवठे येमाई, निमगाव दुडे, चांडोह ,पिंपरखेड, जांबूत, काठापूर , म्हसे, माळवाडी, शरदवाडी, फाकटे तसेच सविंदणे, रावडेवाडी, मलठण,या गावांतील कृषी साहित्य चोरीच्या तक्रारी शिरूर पोलिसांत दाखल आहेत, त्यांचा तपास लावण्यात शिरूर पोलीस अपयशी ठरत असल्याची चर्चा नागरिकांमधून झडत आहे.
शिरूरच्या बेट भागात चोरट्यांनी फोडलेली कृषी साहित्य, खते – औषधांची दुकाने, किराणा दुकाने तसेच घरफोड्या या घटनांचा तपास आजवर लागलेला नाही. यामध्ये टाकळी हाजीतील दोन निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरफोडीचाही समावेश आहे.
मंदिरातील चोऱ्यांबाबत यापूर्वीच्या काही घटनांतील आरोपींचा शोध लागलेला नसताना नुकतेच आमदाबाद येथील मंदिरात चोरी झाल्याने या चोरांना शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नाकाबंदी तसेच रात्रीच्या वेळी गस्तीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाढ केली असून ग्रामीण भागातील गावांमध्ये ग्रामसुरक्षा दले सक्रिय करण्यात येत आहेत.
संजय जगताप, पोलीस निरीक्षक शिरूर