टेमकरवस्ती शाळेजवळ गतीरोधक तयार … टाकळी हाजी शिरूर रस्त्यावरील खड्डे बुजवले
टाकळी हाजी
टाकळी हाजी (तालुका शिरूर) येथील टेमकरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळे जवळ गतिरोधक उभारण्याच्या दोन वर्षपूर्तीच्या मागणीची आणि टाकळी हाजी – शिरूर रोड वर पडलेल्या खड्यांबाबत स्थानिक नागरिक आणि शिक्षकांनी आवाज उठविला होता. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने शाळेजवळ रस्त्यावर पट्टे मारून , चौकातील दोन्हीही रस्त्यावर फलक लावण्याची व्यवस्था केली आहे.
तसेच टाकळी हाजी- शिरूर मार्गावर अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले होते , ते खड्डेही बुजविण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेची टेमकरवस्ती प्राथमिक शाळा शिरूर – नारायणगाव या प्रमुख मार्गालगत आहे. यावर गतिरोधक नसल्याने आतापर्यंत अनेक जीवघेणे अपघात या परिसरात झाले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांचे शाळेसमोरच अपघात झाले आहेत. शाळे समोर दोन रस्ते एकत्र येत आहेत. म्हसे रोड शाळेसमोर या मुख्य रस्त्याला मिळत आहे.त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने पुढे शाळा आहे असे फलक आणि गतिरोधक झाले पाहिजेत अशी मागणी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होत होती.
या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता नवनाथ शेळके यांनी तत्काळ बातमीची दाखल घेवून काम पूर्ण केले याबद्दल टाकळी हाजी चे सरपंच अरूणा घोडे,शाळेचे मुख्याध्यापक विकास उचाळे आणि दामूआण्णा प्रतिष्ठान च्या वतीने समाधान व्यक्त केले.