पिंपरखेड –देवगाव रस्त्यावर मोठमोठे खड्डे, डागडुजी करण्याची नागरिकांची मागणी
प्रफुल्ल बोंबे : पिंपरखेड ( दि. ०३)
पिंपरखेड वार्ताहर ; दि. ०३- गेली अनेक दिवसांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असणारा आणि दळणवळण, ऊस वाहतूक आणि शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ये-जा करण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या शिरूर –आंबेगाव तालुक्यांना जोडणाऱ्या पिंपरखेड – देवगाव रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचून मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून तात्पुरत्या स्वरुपात केवळ मुरुमीकरण तरी करा, अशी केविलवाणी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.
निवडणुकांच्या तोंडावर अनेक नेते येऊन आम्हास केवळ आश्वासन देतात, परंतु विकासकामांच्या बाबतीत आमच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात आहे. गेली अनेक वर्षांपासून आम्ही या रस्त्याचे कामासाठी निधीची मागणी करत आहोत परंतु अद्यापही कोणताच निधी या रस्त्यासाठी मिळालेला नसून स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तरी मुरुमीकरण करून तात्पुरता दिलासा द्यावा अशी आमची मागणी असल्याचे सोसायटीचे संचालक नरेंद्र बोंबे यांनी सांगितले.तर या रस्त्यांचे डांबरीकरणासाठी आपण राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचेकडेही पाठपुरावा केला असल्याचे ग्रामपंचायत सदस्य , माजी सैनिक बळवंत बोंबे यांनी सांगितले.
हा भाग बिबट्याप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जात आहे. मोठ्या प्रमाणात बिबट्याचे वास्तव्य असलेल्या भागातून हा रस्ता जात असून पिंपरखेड, देवगाव, चांडोह, लाखणगाव या परिसरातून अनेक शालेय विद्यार्थी ये जा करत आहेत. रात्रीच्या वेळी अनेक शेतकरी दुध उत्पादक या रस्त्याने जात येत असून पडलेल्या खड्यांमुळे वाहन चालवणे मुश्कील होत असून बिबट्याच्या भीतीपोटी जीव मुठीत धरून नागरिकांना प्रवास करावा लागत असून या कामांसाठी जर राजकीय नेते आमच्याकडे दुर्लक्ष करत असतील तर येणाऱ्या काळातील निवडणुकांवर आम्ही बहिष्कार घालू असा इशाराही नरेंद्र बोंबे, भाजप नेते रविंद्र बोंबे, संदिप बोंबे, हिरामण बोंबे, दत्तात्रय बोंबे, शुभम बोंबे, मंगेश बोंबे आदींनी यावेळी दिला आहे.