पिंपरखेड गावठाणलगतची अस्वच्छता ठरतेय साथीच्या रोगांना निमंत्रण

0

प्रफुल्ल बोंबे: पिंपरखेड (दि.३)

पिंपरखेड (ता.शिरूर) येथील गावठाणनजीक रस्त्याच्या कडेला उघड्यावर पडलेल्या ओल्या व सुक्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. पिंपरखेड गावठाण येथून जात असलेल्या वडनेर खुर्द, देवगाव रस्त्यालगतच मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असून ग्रामपंचायत प्रशासनाकडून कसल्याही प्रकारे या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही. वारंवार तोंडी सांगूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांनी मात्र ग्रामपंचायतच्या निद्रिस्त कारभारावर नाराजी व्यक्त करत उघड्यावर पडलेल्या कचरा, प्लास्टिक व घाणीची तातडीने योग्य विल्हेवाट लावण्याची मागणी सोसायटीचे संचालक नरेंद्र बोंबे, रविंद्र बोंबे, हिरामण बोंबे, शुभम बोंबे यांनी केली आहे.

 

मागील आठवड्यात पडलेल्या पावसामुळे संबंधित ठिकाणी उघड्यावर टाकलेला कचरा जागेवरच सडून चाललेला आहे. त्यापासून मोठ्या प्रमाणात पसरलेली दुर्गंधी आणि डासांचा वाढलेला उपद्रव यामुळे आरोग्याच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होऊ लागला असून सध्याच्या काळात वाढलेले टायफॉईड, डेंग्यू, मलेरिया आदि साथीचे आजार बळावण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

 

जवळच असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या चिमुरड्यासह विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षा धोक्यात येऊ पाहत असून याबाबत ग्रामपंचायतकडून तातडीने कार्यवाही व्हावी अशी मागणी पालकांमधून केली जात आहे. सदर ठिकाणी कचऱ्याची साठवणूक करण्यासाठी कचराकुंडी ठेवण्यात आली आहे. मात्र व्यवसायिक आणि गावात राहणारी काही कुटुंबे उघड्यावरच घरातील कचरा , पिशव्या आणि सडलेल्या पालेभाज्या उघड्यावर टाकत असल्याने या लोकांना योग्य समज देण्यात येऊन ग्रामपंचायत यांचेकडून या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात जेणेकरून उद्भवणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याबाबत ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांनी योग्य खबरदारी घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.