टाकळी हाजी येथे स्वच्छ्ता मोहिमेस शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचा प्रतिसाद
टाकळी हाजी l राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहनास रविवारी ( दि.१) टाकळी हाजी (ता.शिरूर) येथे ग्रामपंचायत प्रशासन, शाळा व ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला.
सरपंच अरुणा घोडे,उपसरपंच गोविंद गावडे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे यांनी या उपक्रमासाठी ग्रामस्थ तसेच शालेय व्यवस्थापनास सहभागी होण्याचे आवाहन केले होते. येथील जिल्हा परिषद शाळा व बापुसाहेब गावडे माध्यमिक विद्यालयातील सुमारे ७०० विद्यार्थी तसेच शिक्षकांनी शाळेतून स्वच्छतेसंदर्भात प्रभात फेरी काढून परिसर स्वच्छ केला. स्वच्छता विषयावर घोषवाक्य , पोस्टर , कविता लेखन, रांगोळी आदी उपक्रम राबविण्यात आले. आय टी सी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत त्यासाठी सहकार्याची तयारी दर्शविली.
माजी सरपंच दामूशेठ घोडे , सोसायटीचे अध्यक्ष बन्सीशेठ घोडे, विद्यालयाचे प्राचार्य आर बी गावडे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका आशा खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतचे सदस्य , कर्मचारी, शिक्षक,विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी गावठाण परिसरात शपथ घेत स्वच्छ्ता केली. तसेच मळगंगा कुंड परिसरात ग्रामपंचायत सदस्यांनी स्वच्छ्ता करून शपथ घेतली.
आजादी का अमृत महोत्सवांतर्गत मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांनी आणलेली १ मुठ माती व १ चिमुट तांदूळ गोळा करून अमृत कलश यात्रा काढण्यात आली.